उंडाळे, मालखेड चेकपोस्टवर 3 लाख 62 हजाराची रोकड जप्त

उंडाळे : रोकड सापडलेल्या कारसह पोलीस कर्मचारी.

कराड – लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू आहे. या दरम्यान, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून येत असून रोकड सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. आज देखील उंडाळे येथे कारमध्ये 1 लाख 92 हजाराची आणि मालखेड चेकपोस्टवर 1 लाख 70 हजाराची रोकड सापडली. वाहन चालकाला त्याबाबत योग्य खुलासा न करता आल्याने ती रक्कम पोलिसांनी पंचांसमक्ष ताब्यात घेतली आहे.

याबाबतची माहिती अशी, उंडाळे चेकपोस्टवर आज दुपारी वाहनांची तपासणी सुरू होती. चेकपोस्टवर आलेल्या मारूती कारची (क्र. एम. एच. 02 ए. यू. 8730) तपासणी करताना कारमध्ये 1 लाख 92 हजाराची रोकड आढळून आली. कार चालक प्रकाश नाना वीर (रा. तुळसण, ता. कराड) यांनी सदरची रक्कम व्यापारातील असल्याचे सांगितले. मात्र, त्याबाबतची कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम ताब्यात घेतली आहे. दुसर्‍या घटनेत मालखेड येथील चेकपोस्टवर वाहन तपासणीवेळी इंडिगो कारमध्ये (क्र. एम. एच. 10 बी. ए. 708) 1 लाख 70 हजाराची रोकड सापडली. कार चालक लक्ष्मण सुरेश तोडकर (रा. कासेगाव, ता. वाळवा) याला रकमेबाबत समाधानकारक खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम पंचांसमक्ष ताब्यात घेतली.

आचारसंहिता काळात 50 हजारपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येत नाही. तसेच50 हजारापेक्षा अधिक रक्कम जवळ असल्यास त्याबाबतची अधिकृत कागदपत्रे जवळ नसल्यास भरारी आणि स्थिर पथकाकडून ती रक्कम ताब्यात घेतली जात आहे. आतापर्यंत कराड तालुक्यात विविध ठिकाणी लाखो रूपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपासणी नाक्यांवर वाहनांमध्ये रोख रक्कम सापडण्याच्या घटना घडत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.