मॉस्को – रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोटात किमान तिघे ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये दोन पोलीस अधिकारी आहेत. दोन दिवसांपुर्वी रशियाच्या एका वरिष्ठ जनरलची कारबॉम्बच्या स्फोटात हत्या झाली होती. त्या ठिकाणापासून जवळच आजचा बॉम्बस्फोट झाला आहे. येलेत्स्काया रस्त्यावर पोलिसांच्या व्हॅनजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना दोन पोलीस अधिकाऱ्यांना दिसला. चौकशीसाठी संशयिताजवळ जाताच या व्यक्तीने बॉम्बचा स्फोट केला, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. जखमी झालेले दोन्ही पोलीस अधिकारी नंतर मरण पावले. एक पादचारी व्यक्तीही या स्फोटात मरण पावला. या या तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून डीएनए तपासणी केली जाणार आहे. हा स्फोट याच व्यक्तीने घडवला असल्याचा संशय आहे. पण निष्कर्ष काढण्यासाठी तपास अधिकाऱ्यांकडून सीसीटिव्हीचे फुटेज तपासले जात आहे. हा संशयित युक्रेनच्या गुप्तचरांशी संबंधित असावा, असा अंदाज स्थानिक वृत्तवाहिनीने व्यक्त केला आहे. दरम्यान रशियाची राजधानी मॉस्कोसह इतर काही ठिकाणांवर युक्रेनकडून रात्रभरात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले केले गेले आहेत, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने युक्रेनची १७२ ड्रोन हवेतच नष्ट केली आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.