इराणमध्ये बेपत्ता झालेल्या 3 भारतीयांची सुटका

तेहरान : इराणमध्ये बेपत्ता झालेल्या 3 भारतीय व्यक्तींची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हे तिगांच्या सुटकेसाठी सहकार्य केल्याबद्दल भारत सरकारने इराण सरकारला धन्यवाद दिले आहेत. हे तिघेही गेल्या महिन्यापासून इराणमध्ये बेपत्ता झाले होते. त्यांच्या शोधासाठी आणि सुटकेसाठी मदत करून इराणने भारताबरोबरच्या मैत्रीचा आदर राखला आहे, अशा शब्दात भारताने इराणला धन्यवाद दिले आहेत.
बेपत्ता झालेल्या तिन्ही भारतीयांना दक्षिण तेहरानमधील वरमिन येथे ओलिस ठेवण्यात आले होते. त्यांचे अपहरण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई करण्यात आली आणि या तिघांना मुक्त करण्यात आले. अपहरण केलेल्या तीन भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे आणि ते आता भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत, त्यांना लवकर मायदेशी परत आणण्यास मदत केली जात आहे, असे दूतावासाने सांगितले.
अमृतपाल, हुसनप्रीत सिंग आणि जसपाल सिंग अशी या तिघांची नावे असून ते मूळचे पंजाबमधील रहिवासी आहेत. त्यांच्या सुटकेसाठी इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे गेल्या आठवड्यात, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते. ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी निघालेल्या तिघांना दिशाभूल करून दुबईमार्गे इराणला नेण्यात आले होते. पाकिस्तानी मानवी तस्करांनी या तिघांचे अपहरण केल्याचे नंतर निष्पन्न झाले होते. अपहरणकर्त्यांनी या तिघांच्या कुटुंबियांकडे खंडणीची मागणी केल्यावर हे प्रकरण उघड झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाने या तिन्ही व्यक्तींच्या सुटकेसाठी इराणला आवाहन केले होते.





