Buldhana Accident News : बुलढाणा-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, धाड गावाजवळ शिवशाही बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला भरधाव दुचाकीने धडक दिली. या दुचाकीवर तीन जण प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. पोलिसांना तसेच रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी येथील कैलास दांडगे, रवी चंदनशिव आणि अंकुश पाडळे अशी आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही युवक २० वर्षांखालील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनास्थळी मोठी गर्दी उसळली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.