जम्मू काश्मीरमध्ये 3 ड्रग्ज स्मगलर्स ठार

जम्मू – जम्मू काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानातील 3 अमली पदार्थांचे तस्कर ठार झाले. जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा घुसवण्याचा प्रयत्न बीएसएफच्या जवानांनी हाणून पाडला. यावेळी 30 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर चकमकीत 3 तस्कर ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावर्षी पाकिस्तानातून भारतीय हद्दीमध्ये अमली पदार्थ घुसवण्याचा आतापर्यंतचा हा चौथा प्रयत्न बीएसएफच्या जवानांनी हाणून पाडला आहे. तर वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 9 तस्करांना यमसदनाला धाडण्यात आले आहे, असे जम्मू काश्मीर विभागाचे बीएसएफचे महानिरीक्षक डी.के. बूरा यांनी सांगितले.
तस्करांनी अंधार आणि धुक्याचा फायदा घेऊन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला असेही त्यांनी सांगितले.





