Nagar | गृह मतदानात श्रीगोंद्यात २९५ मतदारांचे मतदान

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात झालेल्या गृह मतदानात (होम वोटिंग) ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग असे एकूण २९५ मतदारांचे मतदान झाले. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दि.१४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान करण्यात आले. यात ३०५ पैकी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग असे एकूण २९५ मतदारांनी गृहमतदान करवून घेतले.
मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ.क्षितिजा वाघमारे, नायब तहसीलदार पंकज नेवसे गृह मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवत मतदान घडवून आणले.





