NEET Exam Paper Leak : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने विविध राज्यातून सहा आरोपींना ताब्यात घेतले होते. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर, राजस्थानमधील जयपूर तसेच हरियाणातील गुरुग्राम येथून आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार लातूरचा माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी असल्याचे तपासात उघड झाले असून, सीबीआयने त्याला पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. (NEET Exam Paper Leak) आज त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कुलकर्णी हा नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अत्यंत गोपनीय प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी संबंधित होता, अशी माहिती समोर आली आहे. कोण आहे पी. व्ही कुलकर्णी? (NEET Exam Paper Leak) NEET Exam Paper Leak : 28 वर्षे विद्यार्थ्यांना शिकवलं, आता NEET पेपरफुटीचा सूत्रधार; पी. व्ही. कुलकर्णींची कुंडली समोर पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्र विषयाचा नामांकित प्राध्यापक असून लातूरमधील प्रसिद्ध दयानंद महाविद्यालयात त्याने तब्बल 28 वर्षे अध्यापन केले होते. काही वर्षांपूर्वी तो सेवेतून निवृत्त झाला होता. लातूरमधील मेडिकल प्रवेश परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात त्याचा मोठा दबदबा होता. निवृत्तीनंतर तो पुण्यात वास्तव्यास राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. सीबीआयच्या तपासात कोणती माहिती समोर आली (NEET Exam Paper Leak) सीबीआयच्या तपासानुसार, कुलकर्णीला NEET प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश होता. त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून रसायनशास्त्राचा पेपर फोडल्याचा आरोप आहे. एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात त्याने आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना एकत्र करून परीक्षेपूर्वीच प्रश्न आणि उत्तरे पाठ करण्यास भाग पाडल्याचेही तपासात समोर आले आहे. संशय येऊ नये म्हणून… या घोटाळ्यातील आरोपींनी विषयवार पेपरफुटीचे रॅकेट उभारले होते. कुलकर्णीकडे केमिस्ट्रीचा पेपर फोडण्याची जबाबदारी होती, तर नाशिकचा शुभम खैरनार आणि त्याचे साथीदार बायोलॉजीचा पेपर लीक करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तपास यंत्रणांचा संशय येऊ नये म्हणून संपूर्ण 700 मार्कांचा पेपर एकत्र न फोडता, विषयानुसार तुकड्यांमध्ये पेपर लीक करण्यात येत होता, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. नीट चालकाची तब्बल ११ तास चौकशी दरम्यान, सीबीआयच्या पथकाने लातूरमधील एका नामांकित नीट क्लास संचालकाची तब्बल 11 तास चौकशी केली. या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले याचा तपशील समोर आलेला नसला तरी या कारवाईमुळे लातूरसह राज्यभरातील खासगी नीट क्लास चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नाशिकचा शुभम खैरनार, जयपूरचे मंगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल, गुरुग्रामचा यश यादव आणि महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथून अटक करण्यात आलेला धनंजय लोखंडे अशी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. हेही वाचा : Karad : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात