Jalgaon Municipal Election : जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षशिस्त भंग करत महायुती व भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या माजी नगरसेवक जितेंद्र मराठेंसह तब्बल २७ जणांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी रांग लागली होती. सुमारे ५०० इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. मात्र जागावाटपात भाजपला केवळ ४६ जागांवर अधिकृत उमेदवार द्यावे लागल्याने अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तिकीटे कापण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या काही इच्छुकांनी बंडखोरी करत थेट भाजप व महायुतीच्या उमेदवारांविरोधात निवडणुकीत उडी घेतली. या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवसांपूर्वी बंडखोर उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. दोन दिवसांत उमेदवारी मागे घेऊन महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, संबंधितांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने अखेर पक्षाने कठोर पाऊल उचलत २७ जणांची थेट हकालपट्टी केली. हकालपट्टी झालेल्यांची नावे संगीता गोकुळ पाटील, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शांताराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, मयूर श्रावण बारी, तृप्ती पांडुरंग पाटील, सुनील ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील, गिरीश कैलास भोळे, कैलास बुधा सूर्यवंशी, जितेंद्र भगवान मराठे, प्रिया विनय केसवानी, रुपाली स्वप्नील चौधरी, अंजू योगेश निंबाळकर, मयुरी जितेंद्र चौथे, जयश्री गजानन वंजारी, ज्योती विठ्ठल पाटील, उज्ज्वला संजय घुगे, दिनेश मधुकर ढाकणे, कोकिळा प्रमोद मोरे. दरम्यान, बंडखोर व अपक्ष उमेदवारांमुळे काही प्रभागांमध्ये भाजपच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ही बंडखोरी भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.