धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली असताना, शुक्रवारी सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. गेल्या ७५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोंडाईमध्ये हा चमत्कार घडल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याचे पणनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा हा करिश्मा असल्याचे म्हटले जाते आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षांसह २६ नगरसेवक निवडून द्यायचे होते. या जागांसाठी सत्ताधारी महायुतीसह भाजपा व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल केले होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची नागराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, गुरुवारपर्यंत झालेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपाचे ९ नगरसेवक बिनविरोध झाले होते. निवडणूक रिंगणात उर्वरित जागांसाठी भाजपा नगरसेवकांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आव्हान होते. मात्र, शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीमधील उर्वरित उमेदवारांनी बिनशर्त आपले अर्ज आश्चर्यकारकपणे माघारी घेतले. त्यामुळे दोंडाईचा नगरपालिकेतील सर्वच्या सर्व २६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. भाजपकडून दावा मंत्री जयकुमार रावल यांनी आपले राजकीय कसब वापरून विरोधी गटातील सर्वच इच्छुक उमेदवारांना आपापले अर्ज माघारी घेण्यास प्रवृत्त केल्याने हे शक्य झाल्याचे बोलले जाते आहे. सर्वच २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मिळताच महायुतीसह भाजपकडून जल्लोष करण्यात आला. राज्यात नगराध्यक्षांसह सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून आणणारी दोंडाईचा ही संपूर्ण राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे, असा दावा या निमित्ताने भाजपकडून करण्यात आला आहे.