सातारा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 18 ते 23 जून या कालावधीत जिल्ह्यात असून पालखी मार्गावरील गावांसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून 25 लाख 25 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित 50 टक्के निधी शासनामार्फत वितरित करण्यात येणार आहे. या निधीमधून ग्रामपंचायतींमार्फत वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याची तयारी प्रशासनाच्यावतीने सुरु आहे. वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाचे विविध विभाग काम करत आहेत. पालखी मार्गावरील गावांमध्ये वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी दरवर्षी संबंधित ग्रामपंचायतींना शासनाकडून 50 टक्के व जिल्हा परिषद स्वनिधीमधून 50 टक्के असा निधी वितरित करण्यात येतो. त्यानुसार जिल्हा परिषदेच्यावतीने 25 लाख 25 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित 50 टक्के निधी शासनाकडून देण्यात येणार असल्याचे श्री. खिलारी यांनी सांगितले. जिल्हा परिषद स्वनिधीमधून बरड ग्रामपंचायत (रात्रीचा मुक्काम) 35 हजार, तरडगाव ग्रामपंचायत (रात्रीचा मुक्काम) 35 हजार, निंभोरे ओढा (दुपारचे जेवण) एक लाख 75 हजार रुपये, पिंपरद ग्रामपंचायत (दुपारचे भोजन) एक लाख 75 हजार रुपये, निंबळक (दुपारचा विसावा) एक लाख, काळज (सकाळचा विसावा) एक लाख, सुरवडी, विडणी,पाडेगाव, कोरेगाव, कापडगाव, राजुरी, जाधववाडी (फ), कोळकी, पाडेगाव प्रत्येकी 75 हजार, गोळेगाव 25 हजार असा निधी वितरित करण्यात आला. या निधीमधून पालखी तळावरील जमीन स्वच्छता, सपाटीकरण व मुरमीकरण, स्वच्छतागृहांची व्यवस्था, चराचे शौचालय उभारणी तसेच सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व सफाई, तात्पुरती स्नानगृह उभारणी, तळावरील मंडप डेकोरेशन, लायटिंग तसेच स्वागत कमान व लाईट टॉवर उभारणे, पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था व पाणीपुरवठ्यासाठी स्टॅंड पोस्ट, गटार, नालेसफाई करुन जंतुनाशकांची फवारणी, गावातील स्वच्छताविषयक सोयीसुविधा व इतर अनुषंगिक कामे, पालखी स्वागत व निरोप ठिकाणी कक्ष उभारणी करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. शुध्द, स्वच्छ पाण्यासाठी पाच लाखांची तरतूद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान खंडाळा व फलटण तालुक्यांत वारकऱ्यांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासकीय टॅंकरसाठी लागणाऱ्या इंधन खर्चासाठी व इतर सादिल खर्चासाठी खंडाळा पंचायत समितीस दोन लाख तर फलटण पंचायत समितीस तीन लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून वारकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.