नगर | शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर २४४ गुन्हेगार दोन दिवसासाठी हद्दपार

नगर, (प्रतिनिधी) – नगर शहरासह उपनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज, सोमवार मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनांकडून ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपारीक मार्गावरून सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दरम्यान शिवजयंती कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. नगर शहर हद्दीतून २४४ गुन्हेगारांना दोन दिवसासाठी हद्दपार करण्यात आले आहे. शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नगर शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सकाळी सव्वा आठ ते दुपारी बारा यावेळेत रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या वतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाचनंतर माळीवाडा येथील अश्वारूढ पुतळ्यापासून मुख्य मिरवणूकीस सुरूवात होणार आहे. या मिरवणुकीत तीन शिवमंडळ सहभागी होणार आहेत.
यामध्ये पैलवान प्रतिष्ठान माळीवाडा, छत्रपती शिवाजी महाराज जन्मउत्सव समिती नालेगाव, साई संघर्ष युवा प्रतिष्ठान नालेगाव यांचा समावेश आहे. तसेच सावेडी उपनगरात पाइपलाइन रस्त्यावर शिवजयंती उत्सव समिती मित्र मंडळ व बोल्हेगावात समस्त बोल्हेगाव प्रतिष्ठान यांच्यावतीने मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. भिंगार शहरात सकल मराठा समाजाकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक शांतता राहावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नगर शहर हद्दीतून २४४ गुन्हेगारांना दोन दिवसासाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून ९८, तोफखाना हद्दीतून ७० तर भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील ७६ जणांचा समावेश आहे.
असा आहे पोलीस बंदोबस्त
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक तीन, पोलीस निरीक्षक ७, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक 19, अंमलदार 295, होमगार्ड 70, एसआरपीचे एक प्लॅटून, आरसीपीचे एक प्लॅटून असा बंदोबस्त तैनात केला होता.





