- भोसरी पोलिसांची कारवाई
पिंपरी – ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा भोसरी पोलिसांनी पर्दापाश केला आहे. या कारवाईत 12 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 24 पिस्तूल व 38 जिवंत काडतुसे जप्त केली.
बबलूसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला (रा. उमर्टी, पो. बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा. अंमलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव, मूळ रा. बडवाणी, मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (रा. भोसरी, मूळ रा. धुळे) उमेश अरून रायरीकर (रा. गायकवाड वाडी, बहुली, ता. हवेली), बंटी उर्फ अक्षय राजू शेळके (रा. मुंढवा, पुणे), धीरज अनिल ढिगारे (रा. हडपसर, पुणे), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (रा. पेरणे फाटा, मूळ रा. चीलोबा वस्ती, मलठण, ता. दौंड), मॉन्टी संजय बोथ उर्फ मॉन्टी वाल्मीकी (रा. नेहरूनगर, पिंपरी), अमित बाळासाहेब दगडे (रा. बावधन), राहूल गुलाब वाल्हेकर (रा. भोर), संदीप आनंता भुंडे (रा. बावधन) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीत पिस्तुलांचा वापर होऊन गुन्हे घडण्याची शक्यता होती. त्यानुसार पिस्तुल बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते. भोसरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश सावंत आणि सुमित देवकर यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपी रुपेश पाटील याला अटक केली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार काडतुसे जप्त केली. आरोपीने ते पिस्तूल मध्यप्रदेशातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील बलवाडी, उमर्टी गावाजवळ जंगलात सापळा रचून पाठलाग करून पिस्तुलाचा मुख्य डिलर आरोपी रॉनी बरनाला याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ पिस्तूल व 20 जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर रॉनीचा मध्यप्रदेशातील साथीदार कालू पावरा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतुसे जप्त केली. आरोपींनी पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी अन्य आरोपींनाही अटक केली.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमीत देवकर, विनोद वीर, संतोष महाडिक, आशिष गोपी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सोशल मीडियाचा वापर; शस्त्रांचा मध्यप्रदेशातून पुरवठा
आरोपी शस्त्रांचा मध्यप्रदेशातून पुरवठा करीत असत. त्यासाठी आरोपी रॉनी व कालू हे सोशल मीडियाद्वारे आरोपींना त्यांचा संपर्क क्रमांक देत असत. तसेच अनेक सराईत गुन्हेगार येरवडा जेलमध्ये असताना आरोपी रॉनी व कालू यांचा संपर्क क्रमांक एकमेकांना देत असत.”मुळशी पॅटर्न’नुसार गुन्हे करणारा आरोपी नन्या रायरीकर तसेच राहुल वाल्हेकर, अमित दगडे, धीरज ढिगारे, बंटी शेळके यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.