सासवड : सासवड शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणी, लाईट आणि गटरसारख्या मूलभूत सुविधांवर ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे नमूद करीत सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले शिवसेना (उबाठा गट) उमेदवार अभिजीत जगताप यांनी शहराला आगामी काळात आधुनिक, स्वच्छ कालसुसंगत बनविण्याची ग्वाही दिली. नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सासवड शहराचा विकास न करता सगळ्या कारभाराचा बट्ट्याबोळ करून केला आहे, असा सणसणाटी आरोप जगताप यांनी यावेळी केला. जगताप यांनी घेतलेल्या प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. जगताप म्हणाले की,“सासवड शहरासाठी वीर जलाशयातून होणारी योजना वेळेत पूर्ण करून शहरातील प्रत्येक घराला २४ तास शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणी मिळेल यासाठी आमची पहिल्या दिवसापासूनची धडपड राहणार आहे. सासवडमधील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी ही योजना महत्त्वाची असून प्रशासनाकडे प्रलंबित असलेली प्रस्तावित फाईल पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. यावेळी जगताप यांनी सत्ताधाऱ्यांवर शहरातील अधोसंरचनेतील त्रुटींवरही लक्ष वेधले. जगताप म्हणाले, सासवड शहरातील वीज, पाणी आणि बंद पडलेली गटर योजना पूर्ण करून,नागरिकांना स्वच्छ, सुटसुटीत आणि सुरक्षित वातावरण मिळावे हा आमचा उद्देश आहे. शहरातील गटारव्यवस्था जीर्णावस्थेत असून अनेक भागात पावसाळ्यात दूषित पाणी रस्त्यावर येत असते. हे चित्र बदलण्यासाठी आधुनिक ड्रेनेज सिस्टीम, रस्त्यांचे सौंदर्यीकरण आणि लाईट व्यवस्था दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊ. नागरिकांनी सभेत समस्या मांडल्या जगताप यांच्या सभेत विविध प्रभागातील नागरिकांनी शहरातील समस्या मांडल्या.त्या ऐकून जगताप यांनी प्रत्येक समस्येवर ठोस उपाय देत नागरिकांना विश्वास दिला की, सासवडचा चेहरा बदलणे हे आमचे ध्येय आहे. ते कृतीतून सिद्ध करू. सभेला महिलांसह युवकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जगताप यांनी सर्व नागरिकांना आगामी निवडणुकीत पारदर्शक परिपूर्ण विकासाचा मार्ग निवडण्याचे आवाहन केले.