चार टोळ्यांमधील 23 जण तडीपार

सातारा – जिल्ह्यातील कराड शहर, उंब्रज, पाटण, सातारा शहर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुखापत, शिवीगाळ, दमदाटी, गर्दी, मारामारी, सरकारी कामात अडथळा आणणे, दगडफेक, जाळपोळ करणे, मटका, जुगार, सावकारी, जबरी चोरी, खंडणी, बेकायदा दारु विक्री आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चार टोळ्यांमधील 23 जणांना जिल्ह्यातून तडीपार केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.
अधिक माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशाल उर्फ थिंग्या श्रीकांत घोडके (रैनाक गल्ली, कराड), गणेश संजय वायदंडे, शुभम सुनील जाधव, बजरंग उर्फ बज्या सुरेश माने, पवन सुनील भोसले, योगेश दादा भोसले, प्रतीक विजय साठे (बुधवार पेठ, कराड),
आकाश उर्फ सोन्या नीलेश रावखंडे (रा. गुरुवार पेठ, कराड), संकेत राजेश डांगे, आदित्य मदन घाडगे (शुक्रवार पेठ, कराड), सत्यजित गोरख सूर्यवंशी (शिक्षक कॉलनी, कराड) यांना सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच दुसऱ्या टोळीचा प्रमुख कुंदन जालिंदर कराडकर (गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर, कराड), त्याचे साथीदार अर्जुन यशवंत कुंभार (शनिवार पेठ, कराड), अभिजित संजय पाटोळे (बुधवार पेठ, कराड) यांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यांमधून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख जयसिंग जनार्दन कांबळे (प्रतापसिंहनगर, सातारा), त्याचे साथीदार अजय देवराम राठोड, सुश्रीत तानाजी सावंत, शुभम अजय जाधव, ऋतिक उर्फ बाबा अजय जाधव, गणेश विलास चव्हाण (लक्ष्मीटेकडी, सदरबझार) यांना सातारा जिल्ह्यातून एक वर्ष हद्दपार करण्यात आले आहे. उंब्रज व पाटण पोलीस ठाणे हद्दीत अनेक गुन्हे करणाऱ्या टोळीप्रमुख डुब्या उर्फ नेहांक सुनील पाटील, समीर उर्फ वसीम अमीन मणेर, सुहेल सलीम मोमीन (उंब्रज, ता. कराड) यांना संपूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यांमधून एक वर्ष तडीपार करण्यात आले आहे.
तडीपारीच्या कारवाईत “चिटींग’?
समाजातील शांतता भंग करणारी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांना, त्यांचे उपद्रव असलेल्या भागातून तडीपार करण्याची तरतूद कायद्यात आहे. हे न सुधारणारे गुन्हेगार काही काळ इतर भागात राहिल्याने समाजात शांतता निर्माण होईल, अशी धारणा आहे; परंतु आजवरच्या तडीपारीच्या नावांवर नजर टाकल्यास समाजात पत नसलेल्या गुन्हेगारांना तडीपार करून केवळ कागद रंगवले जात असल्याचे चित्र आहे. “व्हाइट कॉलर’ गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना आणि चुकून असा प्रस्ताव आलाच, तर स्थानिक गुन्हे शाखेतील संबंधितांच्या हातांना घाम सुटत असल्याने तडीपारीच्या कारवाईत “चीटिंग’ असल्याचे बोलले जात आहे.





