पिंपरी – कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील 30 लाखांहून अधिक नागरिक, त्यांचे घर, खासगी कार्यालये, सरकारी, पालिका कार्यालये, सार्वजनिक मालमत्ता आदींचे प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून संरक्षण करण्याचे व जीवित आणि वित्तीय हानी रोखण्याचे काम पिंपरी चिंचवड अग्निशमन दल करते. गेल्या साडेतीन वर्षांत अग्निशामक दलाने 226 जणांचे प्राण वाचविले आहेत.
नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करताना अग्निशामक दलाचे जवान कित्येकदा जखमी होतात. तर कधीकधी त्यांना आपला जीवही गमावावा लागतो. डिसेंबर 2019 मध्ये दापोडी येथे नदीकिनारी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढताना मातीचा ढिगारा कोसळून विशाल जाधव या अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. मात्र कोणत्याही गोष्टीने खचून न जाताना अग्निशामक दलाचे जवान दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत असतात.
याच ऑगस्ट महिन्यात नदीपात्राच्या मध्यभागी प्रवाहात अडकलेल्या एका व्यसनी तरुणाची सुटका अग्निशामक दलाने केली. तसेच प्राधिकरण येथे दलदलीत अडकलेल्या एका व्यक्तीची सुखरूप सुटका अग्निशामक दलाने केली आहे. अनेकदा काही महिला कामासाठी घराबाहेर येतात अन् अचानक लॅचलॉकचा दरवाजाचा आतून बंद होतो. अशावेळी दोरीच्या सहाय्याने जीव धोक्यात घालून अग्निशामक दलाचे जवान खिडकीवाटे प्रवेश करतात व अडकलेल्या बाळाची सुटका करतात.
“त्या’ घटनेची झाली आठवण
बुधवारी पहाटे पूर्णानगर चिखली येथील आगीत चार जणांना वाचविण्यासाठी अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र होरपळून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे 2010 मध्ये भोसरी एमआयडीसी मधील साई इंडस्ट्रीजमध्ये घडलेल्या घटनेची आठवण झाली. साई इंडस्ट्रीज या कंपनीला आग लागली. जीव वाचविण्यासाठी दहा महिला या बाथरूममध्ये शिरल्या. आग त्यांच्यापर्यंत पोहचली नाही. मात्र केमिकलच्या धुरामुळे गुदमरून दहा महिलांचा मृत्यू झाला.
रेस्क्यू ऑपरेशनच्या महत्वाच्या घटना
4 जुलै 2020-भक्ती प्लाझा कुंजीर चौक, पिंपळे सौदागर येथील कार्यालयात अडकलेल्या 12 जणांची सुटका
8 ऑगस्ट 2020-अष्टविनायक सोसायटी, सावंतनगर, भोसरी येथे आगीत अडकलेल्या 13 जणांची सुटका
10 सप्टेंबर 2022-बोपोडी येथे नदीपात्रालगतच्या रस्त्यावर खासगी बसमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 17 जणांची सुटका
8 डिसेंबर 2022-रेम्बो प्लाझा, शिवार चौक, येथील इमारतीला आग लागल्यावर 45 जणांची सुटका केली
11 डिसेंबर 2022-त्रिवेणीनगर येथे आगीत अडकलेल्या चार जणांची खिडकीचे गज कापून सुटका केली
वर्ष वाचविलेले मनुष्य मृत जखमी
2020 63 15 01
2021 40 25 01
2022 93 16 03
2023 24 10 09
एकूण 226 66 14