पिंपरी | शहरातील 226 जाहिरात फलक परवान्याशिवाय

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 136 जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. त्यात काही फलक हे दोन्ही बाजूने आहेत. आतापर्यंत 910 जाहिरात फलक धारकांना आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून परवाने देण्यात आले आहेत. ते सर्व अधिकृत फलक असून, त्यांनी नूतनीकरण करून घेतले आहे. परवाना नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
शहरातील जाहिरात फलकांसाठी महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने परवानगी देण्यात येत असते. फलक परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक असताना शहरातील 910 फलकधारकांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून परवाने घेतले आहेत.
उर्वरित जाहिरात फलकधारकांनी त्वरीत परवाना घ्यावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिला आहे.
एक एप्रिलनंतर 3 महिने परवाना शुल्क न भरल्यास 10 टक्के दंड केला जाणार आहे. सहा महिने शुल्क न भरल्यास 25 टक्के दंड करण्यात येणार आहे. तसेच, परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. दंड व कारवाई टाळण्यासाठी जाहिरात फलकधारकांनी तत्काळ शुल्क भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही खोत यांनी केले आहे.





