लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी शनिवारी इसिस, टीटीपी आणि बंदी घातलेल्या इतर संघटनांच्या 22 संशयित दहशतवाद्यांना अटक करून मोठा दहशतवादी कट उधळून लावल्याचा दावा केला आहे.
काउंटर टेररिझम डिपार्टमेंटने या आठवड्यात पंजाबच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 152 गुप्तचरांवर आधारित ऑपरेशन केली आणि इसिस, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि लष्कर-ए-झांगवी या संघटनांशी संबंधित 22 संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याचे सीटीडीच्या प्रवक्त्याने सांगितले.
या संशयित दहशतवाद्यांना लाहोर, अटक, शेखूपुरा, मुझफ्फरगड, ननकाना साहिब, बहावलपूर, डीजी खान, फैसलाबाद, मुलतान, बहावलनगर आणि रावळपिंडी या भागातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १,६४५ ग्रॅम वजनाची स्फोटके, तीन हातबॉम्ब, एक आयईडी बॉम्ब, १२ डिटोनेटर, ३१ फूट लांबीची सुरक्षा फ्यूज वायर, एक पिस्तूल आणि अन्य घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये हिंसाचार करण्याची योजना आखली होती आणि त्यांना महत्त्वाच्या संस्था आणि व्यक्तिंना लक्ष्य करायचे होते, असे प्रवक्त्याने सांगितले.