महापालिका हतबल : शिल्लक निधीतून कामे करण्याची सुचना
नगर -तत्कालिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैशिष्ट्येपूर्ण योजनेंतर्गत महापालिकेला 10 कोटी रुपये निधी दिला होता. त्या निधीतून नगर शहरातील गावठाणातील 22 रस्त्यांची कामे घेण्यात आली होती. परंतु जादा दराने निविदा व जीएसटीमुळे या रस्त्यांच्या कामांना आणखी सव्वा तीन कोटी रुपये निधी कमी पडत असल्याने या रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत.
याबाबत मार्ग काढण्यासाठी उपमहापौर मालन ढोणे यांनी आज बैठक घेतली. तेव्हा निधी कमी पडत असल्याने कामांचा कार्यारंभ आदेश ठेकेदारांना देण्यात न असल्याची बाबत उघडकीस आली.
विविध विकास कामांसाठी 10 कोटी निधी उपलब्ध झाल्यानंतर बांधकाम विभागाने विविध कामासाठी तीन निविदा मागविल्या होत्या. तिसरी निविदा गावठाण भागातील 22 रस्त्याच्या कामांची आहे.
परंतु जादा दराच्या निविदा व जीएसटीमुळे सव्वा तीन कोटी रुपयाचा निधी कमी पडत आहे.जुन्या गावठाण भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना खड्ड्यामधून मार्ग काढावा लागत आहे. खड्डयामुळे या भागात छोटे मोठे अपघात होत आहेत.
या रस्त्यांच्या कामांसाठी मार्ग निघावा म्हणून ढोणे यांनी आज बैठक घेतली. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष किशोर डागवाले, उपायुक्त प्रदिप पठारे, उपकार्यकारी अभियंता राजभोज, संजय ढोणे, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, गणेश गाडळकर आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये 22 कामाच्या निविदेबाबत चर्चा झाली.
चर्चेमध्ये 22 टक्के वाढीव दराने व जीएसटीमुळे सव्वा तीन कोटीचा निधी पडत आहे. त्यामुळे ही कामे रखडल्याचे समोर आले. शिल्लक 1 कोटी 68 लाख रुपय आहेत. त्यातून तरी कामे करावीत, अशा सुचना यावेळी ढोणे यांनी दिल्या.