दहावी फेरपरीक्षेचा 22.86 टक्‍के निकाल

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलैमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात राज्याचा एकूण निकाल 22.86 टक्‍के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 0. 8 टक्‍क्‍याने निकाल घटला आहे. पुणे विभागाचा निकाल केवळ 18.12 टक्‍के एवढा लागला आहे.

राज्यमंडळाचे अध्यक्ष डॉ. शंकुतला काळे व सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निकाल जाहीर केला आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 9 त 16 जुलै व लेखी परीक्षा 17 ते 30 जुलै या कालावधीत घेण्यात आली होती. एकूण 50 विषयांसाठी ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागातून एकूण 2 लाख 34 हजार 631 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 2 लाख 21 हजार 629 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 50 हजार 667 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी 1 लाख 18 हजार 161 आहेत. हे विद्यार्थी सन 2019-20 या चालू शैक्षणिक वर्षात ए.टी.के.टी.च्या सवलतीमुळे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरत आहेत.

राज्यात सर्वाधिक निकाल हा लातूर विभागाचा 31.49 टक्‍के तर सर्वांत कमी निकाल मुंबई विभागाचा 14.48 टक्‍के इतका लागला आहे. जुलै-ऑगस्ट 2017 च्या परीक्षेचा निकाल 24.44 टक्‍के लागला होता. त्यानंतर सन 2018 मध्ये 23.66 टक्‍के लागला. यंदा त्यात घट होऊन 22.76 टक्‍के निकाल लागला आहे. अंतर्गत गुण बंद केल्यामुळे निकाल कमी लागला आहे हे स्पष्टच आहे. ऑनलाइन निकालानंतर निर्धारित दिनांकापासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून त्यासाठी एकच अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. गुणपडताळणीसाठी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतिसाठी 19 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येणार आहे.

पुणे विभागातील 6 हजार 68 विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे विभागात 35 हजार 624 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्जाची नोंदणी केली होती. यातील 33 हजार 480 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील केवळ 6 हजार 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 4 हजार 284 मुले तर 1 हजार 784 मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षी 23.73 टक्‍के एवढा एकूण निकाल लागला होता. यंदा त्यात 5.61 टक्‍क्‍याने घट झाली असून एकूण 18.12 टक्‍के निकाल लागला आहे. मुलांचा निकाल 16.95 तर मुलींचा निकाल 21.73 टक्‍के लागला आहे. विशेष श्रेणीत 3, प्रथम श्रेणीत 9, द्वितीय श्रेणीत 33 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. पुणे जिल्ह्यातील परीक्षेत गैरमार्गाचे एक प्रकरण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.