सातारा (प्रतिनिधी) -येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या जावळी तालुक्यातील वहागाव येथील 70 वर्षीय करोनाबाधित महिलेचा शनिवारी (दि. 30 मे) रात्री मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. करोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत 516 करोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 158 रुग्ण बरे झाले आहेत. 337 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील 262 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे पुण्यातील एनसीसीएस यांनी रविवारी कळविले आहे, अशी माहितीही डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात 21 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 9, वाई ग्रामीण रुग्णालयातील 36, शिरवळ येथील 52, रायगाव करोना केअर सेंटरमधील 15 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने पुणे येथील एनसीसीएसकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
खावली करोना केअर सेंटरमधून दोघांना सोडले
दरम्यान, खावली येथील करोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या निमसोड, ता. खटाव येथील 20 वर्षांचा युवक व 48 वर्षांचा पुरुष पूर्णपणे करोनामुक्त झाल्याने त्यांना रविवारी घरी सोडण्यात आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले. पुसेसावळी येथील 48 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला होता. कोव्हिड संशयित म्हणून तिच्या घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला आहे. महाबळेश्वर येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या झांजवड येथील 57 वर्षांच्या संशयिताने आत्महत्या केली. त्याच्याही घशातील स्रावाचा नमुना कोव्हिड तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
दरम्यान, करोनाग्रस्तांच्या संख्येत शनिवारी रात्री उशिरा आणखी 32 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील करोना केअर सेंटर्स आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये संशयित म्हणून दाखल असलेल्या 32 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तांबवे (ता. फलटण) येथील 94 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला होता. मृत्यूपश्चात त्याच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जावळी तालुक्यातील बेलावडे येथील 2 पुरुष व 2 महिला, निपाणीतील पुरुष व महिला, काटवलीतील पुरुष, गवडीतील महिला, रांजणीतील महिला, सातारा तालुक्यातील वावदरे येथील पुरुष, खडगावमधील महिला, कुसवडेतील पुरुष, खटाव तालुक्यातील बनपुरी येथील 4 पुरुष व 1 महिला, वांझोळीतील 2 पुरुष व 3 महिला, पाचवडमधील पुरुष, कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील पुरुष, शिरंबेतील पुरुष, कराड तालुक्यातील खराडे येथील पुरुष व 2 महिला, पाटण तालुक्यातील तामिणे येथील दोन पुरुष, यांचा बाधित रुग्णांमध्ये समावेश आहे.