सातारा – पुणे जिल्ह्यातील चिखली येथे घराच्या बांधकामासाठी खोदाई करताना सापडलेली 18 व्या शतकातील 216 सोन्याची नाणी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली. बाजारभावाप्रमाणे या नाण्यांची किंमत दीड कोटी रुपयांहून अधिक आहे.
पिंपरी-चिंचवड भागातील चिखली येथे एका घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम सुरू असताना एका मजुराला तांब्याचा गडू सापडला. त्या गडूचे वजन 526 ग्रॅम असून, त्यात 216 सोन्याची नाणी होती. या नाण्यांचे वजन दोन किलो 357 ग्रॅम आहे. ही नाणी सिराजुद्दीन मोहम्मद बहादूर (दुसरा) याच्या काळातील असावीत, असा अंदाज नाण्यांवरील उर्दू अक्षरांवरून बांधता येतो, असे संग्रहालयाचे शिंदे यांनी सांगितले.
सध्या संग्रहालयात चांदी व तांब्याची सातशे नाणी असून सोन्याची नाणी प्रथमच संग्रहालयात दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेने ती नाणी जप्त केली. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारच्या संग्रहालयाकडे ती सुपुर्द करण्यात आली. प्रवीण शिंदे, वरिष्ठ लिपिक गणेश पवार, अजित पवार, कुमार पवार, विनोद मतकर, देवदास भांबळ उपस्थित होते.