सातारा – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली. या अडचणीच्या काळात ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून सुमारे 21 लाख रुपयांच्या “मानिनी मास्क’ची विक्री करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले व उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी पत्रकार परिषदेत दिली. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना स्वयंसहाय्यता समूहामार्फत “मानिनी मास्क’चे उत्पादन करुन पुरवठा करण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. या कार्यात गावस्तरावरील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांच्या संकल्पनेतून लॉकडाऊन कालावधीत महिला बचत गटांना आधार देण्यात आला. जिल्ह्यात 132 स्वयंसहाय्यता समूहातील 384 महिलांनी या मोहिमेत आजअखेर दोन लाख 14 हजार मास्क तयार केले असल्याची माहिती कबुले व विधाते यांनी दिली. बचत गटांनी तयार केलेले मास्क “मानिनी मास्क’ नावाने तयार केले. स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या मास्कचा पुरवठा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच विविध संस्था व वैयक्तिक पातळीवर करण्यात येत आहे. करोनाचा संसर्ग आटोक्यात येईपर्यंत यापुढेदेखील सातत्याने स्वयंसहाय्यता समूहांमार्फत मास्कचे उत्पादन सुरुच राहणार आहे. मानिनी मास्कच्या माध्यमातून सुमारे 21 लाख रुपयांचा व्यवसाय स्वयंसहाय्यता समूहांना उपलब्ध झाला आहे. यापुढील काळात बचतगटाची चळवळ मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कबुले व विधाते यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.