‘मदर डेअरी’ची 21 एकरची जागा ‘अदाणीं’च्या घशात; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

मुंबई – भाजप सरकार अदाणींवर पुन्हा मेहरबान झालं असून अदाणींसाठी सत्ता राबवली जाते आहे, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. कुर्ला येथील मदर डेअरीची २१ एकरची जागा अदाणींच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान निघाले आहे. त्यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. कोट्यवधी रुपये किंमतीची ही मोक्याची जागा गौतम अदाणींना सरकारने बहाल केला आहे. हा एक महाघोटाळा आहे असाही आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, मोदाणी (मोदी आणि अदाणी) अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजप सरकारने घेतलेली आहे. जी जमीन सरकारी आहे, ती जमीन अदाणींची आहे, असा प्रकार सुरु आहे.
भाजप सरकारने अदाणींसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांचा हक्क मारण्याचा कट रचला. नंतर धारावी पुनर्वसनाच्या नावाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी व पूर्वी जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डम्पिंग ग्राउंडची जागा लुबाडण्याचा डाव मांडला.
आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळून टाकायची आहे. कुणालाही विश्वासात न घेता, कुठलीही जनसुनावणी न करता हा हिरवळीचा भूखंड अदाणींच्या घशात घातला जात आहे. परंतु धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदाणीला नाममात्र दराने हा भूखंड भेट देण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.





