GDP Growth: 2026च्या जीडीपी वाढीमध्ये भारताने अमेरिकेला टाकले मागे, एलोन मस्क म्हणतात, ‘हे सत्तेच्या संतुलनात बदल’
GDP Growth: २०२६ मध्ये जागतिक जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) वाढीमध्ये भारताचे योगदान अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवला आहे.

GDP Growth: जागतिक आर्थिक पटलावर भारताने एक मोठी झेप घेतली असून, २०२६ मध्ये जागतिक जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) वाढीमध्ये भारताचे योगदान अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवला आहे.
या महत्त्वपूर्ण बदलाची दखल घेत जगातील आघाडीचे उद्योजक आणि ‘एक्स’चे प्रमुख एलन मस्क यांनी याला जागतिक सत्तेच्या संतुलनातील मोठा बदल (Shift in Power Balance) म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून विकसित देशांच्या तुलनेत उदयोन्मुख अर्थव्यवस्था ज्या वेगाने प्रगती करत आहेत, त्याचे केंद्र आता आशियाकडे सरकत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
IMFचा अहवाल –
आयएमएफच्या ताज्या अहवालानुसार, २०२६ मध्ये जागतिक जीडीपी वाढीमध्ये भारताचा वाटा सुमारे १७ टक्के इतका असेल, तर याच काळात अमेरिकेचे योगदान ९.९ टक्क्यांवर मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. या सूचीमध्ये चीन पहिल्या स्थानावर असून भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
🌍 Top 10 contributors to global real GDP growth (2026)
1.🇨🇳 China — 26.6%
2.🇮🇳 India — 17.0%
3.🇺🇸 United States — 9.9%
4.🇮🇩 Indonesia — 3.8%
5.🇹🇷 Türkiye — 2.2%
6.🇳🇬 Nigeria — 1.5%
7.🇧🇷 Brazil — 1.5%
8.🇻🇳 Vietnam — 1.6%
9.🇸🇦 Saudi Arabia — 1.7%
10.🇩🇪 Germany — 0.9%…— World of Statistics (@stats_feed) January 31, 2026
याचाच अर्थ, केवळ भारत आणि चीन हे दोन देश मिळून जागतिक आर्थिक विकासाचा मोठा हिस्सा चालवणार आहेत. अमेरिकेसारख्या महासत्तांचा विकास दर या तुलनेत संथ राहणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. एलन मस्क यांनी सोशल मीडियावर या संदर्भातील एक यादी सामायिक करताना स्पष्ट केले की, जगातील आर्थिक शक्तीचे संतुलन आता वेगाने बदलत आहे.
भारताची प्रतिमा एक मोठी बाजारपेठ –
मस्क यांनी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत चीन, भारत आणि अमेरिकेनंतर इंडोनेशिया, तुर्की आणि नायजेरिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. मस्क यांच्या या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा एक मोठी बाजारपेठ आणि आगामी काळातील ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून अधिक गडद झाली आहे. भारताची देशांतर्गत मागणी आणि गुंतवणुकीच्या वाढत्या संधी यांकडे आता जगातील बडे उद्योगपती सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे यावरून अधोरेखित होते.
दरम्यान, २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही एलन मस्क यांच्या या पोस्टचा उल्लेख केला. मस्क यांचे विधान हे भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी दावा केला की, भारत वेगाने जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जरी सध्या भारत चीनच्या मागे असला, तरी अमेरिकेला मागे टाकणे ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे. विरोधकांनी देशाच्या क्षमतेवर आणि प्रगतीवर विश्वास ठेवायला हवा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.





