मियामी -ऑस्ट्रेलियाची अव्वल महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टीने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 1000 एटीपी गुणांच्या मियामी ओपन वर्ल्ड टूर स्पर्धेच्या महिला विभागाचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात तिने चेक प्रजासत्ताकची खेळाडू कॅरोलिना प्लिस्कोवाचा दोन सेटमध्ये 7-6 (7-1) ,6-3 असा पराभव करत हे विजेतेपद आपल्या नावे केले.
कारकिर्दीतील पहिला विजेतेपदाचा सामना खेळताना ऍश्ले बार्टी सुरूवातीलाच 3-1ने पिछाडीवर पडली होती. त्यामुळे दबावात आलेल्या बार्टीने बेसलाईन वरून बॅकहॅन्ड च्या फटक्यांचा चांगला वापर करत सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे सुरूवातीला आघाडीवर असलेल्या प्लिस्कोव्हावर दबाव वाढला त्यात तिने बऱ्याच चुका केल्या त्याचा फायदा घेत बार्टीने सामना टायब्रेकरपर्यंत नेण्यात यश मिळवले. यानंतर टायब्रेकर मध्ये गेलेल्या सामन्यात बार्टीने प्लिस्कोव्हाला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता पहिला सेट 7(7)-6(1) अशा फरकाने आपल्या नावे करत 1-0 अशी आघाडी घेतली.
यानंतर दुसऱ्या सेट मध्ये पहिल्या सर्व्ह पासूनच बार्टीने प्लिस्कोव्हावर दबाव वाढवला. त्यामुळे प्लिस्कोव्हाने पुनरागमन करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र बार्टीने केलेल्या आक्रमक खेळापुढे तिला पुनरागमन करता आले नाही आणि बार्टीने दुसरा सेट 6-3 अशा फरकाने जिंकत सामना 2-0 अशा फरकाने आपल्या नावे केला.