नोकरी असावी तर अशीच! 200 कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय, कर्मचारी आठवड्याला करणार फक्त 4 दिवस काम

4-Day Work Week: एकीकडे भारतातील मोठ्या कंपन्यांचे सीईओ आठवड्याला 70-90 तास काम करण्याचा सल्ला देत असताना, दुसरीकडे काही देशांमध्ये आठवड्याला केवळ 4 दिवस काम करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. ब्रिटनमधील अनेक कंपन्यांनी 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटनमधील जवळपास 200 कंपन्यांनी कामाचा आठवडा चार दिवसांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कर्मचारी आठवड्याला केवळ 4 दिवस काम करणार असले तरीही त्यांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. 4 डे वीक फाउंडेशनद्वारे यासाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर, शेकडो कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेतला आहे.
5 दिवस कामकाज ही पद्धत जुनी झाली असून, आता 4 दिवसांचा कामकाज आठवडा असायला हवा, असे मत व्यक्त केले जात आहे. या निर्णयाबाबत बोलताना 4 डे वीक फाउंडेशनचे संचालक जो राइल म्हणाले की, 9 ते 5 काम ही कामाची पद्धत 100 वर्ष जुनी असून, सध्याच्या काळात ही पद्धत उपयुक्त नाही. 4 दिवसांच्या कामामुळे कर्मचाऱ्यांना अधिक मोकळा वेळ मिळेल व ते अधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतील. तसेच, उत्पादन वाढवण्यासाठी व कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ही चांगली पद्धत आहे.
मार्केटिंग, जाहिरात आणि प्रेस संबंधित कंपन्यांनी सर्वात आधी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता तंत्रज्ञान, आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनीही कामावर 4 दिवसांचा आठवडा लागू केला आहे. यामध्ये लंडनमधील 59 मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोव्हिड-19 महामारीपासूनच कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. 2022 मध्ये अनेक कंपन्यांनी 4 दिवसांचा कामाचा आठवडा लागू केला होता. तसेच, अनेक कंपन्यांनी हायब्रिड मॉडेल देखील स्विकारले आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड, डेन्मार्कसह काही देशांमध्ये आधीपासूनच कामाचा आठवडा चार दिवसांचा आहे.





