पुणे – आई, लहान भावास ठार मारण्याची धमकी देत नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 60 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्ष कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
14 वर्षीय पीडित मुलीच्या आईने याबाबत कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 30 वर्षीय व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.
न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस नाईक अंकुश केंगले यांनी मदत केली. 12 ऑक्टोबर 2017 आणि त्यापूर्वीच्या आठ महिन्याच्या कालावधीत ही घटना घडली. पीडितेच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तिच्या आईने आरोपीशी लग्न केले आहे. तीन वर्षांपासून ते एकत्र राहत आहेत. पीडित नववीत शिकत होती. आईने तिला मावशीकडे मुंब्रा येथे पाठविले. त्यावेळी आठ महिन्यापासून आरोपी अश्लील कृत्य आणि बलात्कार करत असल्याचे तिने मावशीला सांगतीला.
त्यानुसार ही घटना उघड झाली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत बलात्कार कलमानुसार 20 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये दंड, धमकाविणे कलमानुसार 2 वर्षे शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 12 नुसार 3 वर्षे तुरूंगवास आणि 20 हजार रुपये दंड सुनावण्यात आला. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.