वाचवायला गेले 20 रु, दंड भरला 500 रुपये; फुकट्या प्रवाशांकडून चार लाख रु. वसूल

पुणे – पीएमपीने मागील पंधरा दिवसांत 619 फुकट्या प्रवाशांकडून सुमारे चार लाखांचा दंड वसूल केला. यात तरुणवर्ग अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गर्दीचा फायदा घेत काही जण तिकीट न काढताच प्रवास करतात. त्यामध्ये काही जण एक ते दोन बसस्टॉपचे अंतर पाहून उतरतात.
तर, काही महाभाग हे लांब पल्ल्याच्या बसमध्येही 15-20 रुपये वाचवण्यासाठी तिकीट काढत नाहीत. अशा फुकट्यांवर नजर ठेवण्यासाठी पीएमपीने कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, फर्गसन महाविद्यालय रस्ता, वाकडेवाडी ते पिंपरी-चिंचवड, येरवडा, हडपसर यांसह अन्य मार्गांवर ठिकठिकाणी तपासणीस तैनात आहेत.
दिवस व दंडवसुली (रु.)
4 ऑक्टोबर – 28 हजार
9 ऑक्टोबर – 37 हजार
10 ऑक्टोबर – 32 हजार
12 ऑक्टोबर – 29,500
13 ऑक्टोबर – 33,500
15 ऑक्टोबर – 29 हजार
…तर 500 रुपये दंड
पीएमपीचे तिकीट अंतरानुसार 5 ते 80 रुपयांपर्यंत आहेत. शहर परिसरात 5 ते 30 रुपये तर लांब पल्ल्याचा प्रवास असेल जास्तीत जास्त 80 रुपये तिकीट असते. मात्र, हे पैसे वाचवण्याच्या नादात काही जण विनातिकीट प्रवास करतात. तपासणीत अशांना 500 रुपये दंड भरावा लागतो.





