करोनावरील लशीचे 20 लाख डोस तयार – ट्रम्प

न्यूयॉर्क : करोनावरील लसीचे 20 लाख डोस तयार करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या चाचण्या यशस्वी पार पडल्यास ते वापरता येतील, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ही लस वापरण्यासाठी लक्षणीय प्रगती केली आहे, असेही त्यांनी सांगितले, असे दि न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, या लसीबाबत आम्ही काल बैठक घेतली. आपण उत्तम कामगिरी केली आहे. आपल्याकडे काही सकारात्मक सुखद गोष्टी घडत आहेत. लसीच्या निर्मितीत आपण लक्षणीय प्रगती केली आहे.
मात्र ट्रम्प यांनी ही लस कोणी बनवली अथवा नेमक्या कोणत्या लसीबाबतची ही माहिती आहे, याचा उल्लेख केला नाही. त्यांनी या लसीसाठी लागणारा कालावधीही सांगितला नाही.
ट्रम्प प्रशासनाने या लसीसाठी पाच कंपन्यांची निवड केली असून त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली आहे. यातील चार कंपन्यांनी एका स्वरूपाची लस तयार केली आहे. खरे तर ही कंपन्यांची संख्या सात ते आठच्या घरात जाऊन पोहोचते. मात्र काही कंपन्यांनी अगदी वेगळी लस बनवली आहे.
आपण राष्ट्राध्यक्षांच्या मताशी सहमत नसल्याने आपण यावर कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही, असे अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फाऊसी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 2021च्या सुरुवातीला आपण 20 लाख डोस बनवू शकू.





