प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सध्या शिरूर तालुका बिबट्यांच्या वेगवेगळ्या घडामोडींमुळे चर्चेत आलेला असताना, शिरूर वनविभागाच्या वतीने चाळीस दिवसांत तब्बल वीस बिबट्यांचे माणिकडोह बिबट निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. अन्य बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाची रात्रंदिवस धडपड सुरू आहे. तालुक्यातील पिंपरखेड येथे १२ ऑक्टोबर रोजी शिवन्या बोंबे, २२ ऑक्टोबर रोजी जांबूत येथे भागुबाई जाधव आणि २ नोव्हेंबर रोजी रोहन बोंबे या तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिकांचा मोठा उद्रेक होऊन जनआंदोलन उभे राहिले होते.या घटनेमुळे शिरूर तालुक्यातील बिबट्यांचा विषय राज्यात गेला. दरम्यान, वनविभागाने पहिल्या घटनेपासून बिबटे पकडण्याची कार्यवाही सुरू केली. पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्या शार्पशूटरकडून ठार झाला होता.शिरूर तालुक्यातील बिबटे पकडण्यासाठी वनपाल भानुदास शिंदे, गणेश म्हात्रे, गौरी हिंगणे, वनरक्षक प्रमोद पाटील, सोपान अनासुने, नारायण राठोड यांसह बिबट शीघ्र कृती दलाची वेगवेगळी पथके अहोरात्र वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावून प्रयत्न करत आहेत. नुकतेच पिंपळे खालसा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान देण्यात आले. शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चाळीस दिवसांत तब्बल वीस बिबटे पकडून त्यांचे स्थलांतर माणिकडोह बिबट निवारा केंद्रात करण्यात आले असून, अन्य बिबट पकडण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. या गावांतून पकडले वीस बिबटे शिरूर वनविभागाने पिंपरखेडमध्ये अकरा, जांबूतमध्ये चार, फाकटेत एक, टाकळी हाजीमध्ये एक, अन्नापूरमध्ये एक, इनामगावमध्ये एक आणि तळेगाव ढमढेरे येथे एक असे तब्बल वीस बिबटे पकडून त्यांचे स्थलांतर केले आहे. तीन बिबट्यांचा मृत्यू तालुक्यात बिबट्यांच्या घटना वाढत असताना शार्पशूटरकडून नरभक्षक बिबट्याचा खात्मा झाला. अन्नापूर येथील शेतात एक बिबट्या मृत आढळला आणि शिरूर लगत बोऱ्हाडे मळा येथे एका वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला, असा तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.