गणेश चतुर्थीच्या दिवशी दुबे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

गोंदिया : आज राज्यासह देशभरात गणरायाचं आगमन झालं आहे. मात्र, गोंदियामध्ये आज एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा हिरडामाली येथे घराशेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना वाहून गेल्याने 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही सख्खे भाऊ होते. या दुर्दैवी घटनेने दुबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काय घडले नेमके?
रुद्र सुजित दुबे (वय 3) आणि शिवम सुजित दुबे (वय 2) दोन्ही राहणार पोंगेझरा हिरडामाली अशी मृत पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. हिरडामाली इथं पोंगेझरा देवस्थानाच्या बाजूला एक नाला वाहतो. त्या नाल्यावर पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र, पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहते. देवस्थानात राहणारे पुजारी सुजित दुबे यांचे दोघे चिमुकले रुद्र दुबे आणि शिवम दुबे शुक्रवारी सायंकाळी खेळता खेळता या पुलावर पोहोचले. पाण्यात खेळण्याचा मोह चिमुकल्यांना आवरला नाही.
यातच पुलाच्या मध्यभागी पाण्यात खेळता खेळता त्या दोघांचा पाय घसरल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. शुक्रवारी रात्री गोरेगाव पोलिसात या संदर्भात वडील सुजित दुबे यांनी मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर त्यांची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही.
आज शोधकार्य सुरू असताना दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोंगेझरा हिरडामालीच्या जवळ असलेल्या नाल्यात तरंगताना आढळून आले. गोरेगाव पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दोन चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





