हृदयद्रावक ! वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या 2 मुलींसह जावयाचा अपघाती मृत्यू

मालेगाव : वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या 2 मुलींसह जावयाचा उभ्या कंटेनरला कार आदळून झालेल्या अपघातात दुःखद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यालगत घडली आहे. मीनाक्षी अरुण हिरे (53, रा. टिटवाळा, ठाणे), अनिशा विकास सावंत (40) व विकास चिंतामण सावंत (45, ठाकुर्ली, जि. ठाणे) अशी या मृतांची नावे आहेत.
वैभवी प्रवीण जाधव (17, रा.नाशिक) ही तरुणी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नाशिक स्थित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीनाक्षी व अनिशा या दोघी बहिणी होत्या.त्यांच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले होते. अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह एका शववाहिकेतून निमगाव येथे आणण्यात येत होता.
शववाहिकेबरोबर जावई विकास सावंत हे स्वत:च्या वाहनाने येत होते. या वाहनात त्यांची पत्नी अनिशा, मेहुणी मीनाक्षी व नाशिक येथील दुसऱ्या मेहुणीची मुलगी वैभवी असे चौघे होते. गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास त्यांची कार वाके फाट्यालगत कंटेनरला धडकली. त्यात विकास, अनिशा व मीनाक्षीचा जागीच मृत्यू झाला तर वैभवी गंभीर जखमी झाली.





