Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीच्या 2 वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांचे निलंबन

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा हिच्या दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना (पीएसओ) निलंबित करण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये नजरकैदेत असूनही इल्तिजा कठुआला पोहोचल्यानंतर ओमर सरकारने ही कारवाई केली आहे. 8 फेब्रुवारी रोजी इल्तिजा यांनी आरोप केला होता की, ओमर सरकारने मेहबूबा आणि त्यांना नजरकैदेत ठेवले आहे.
दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी, इल्तिजा कठुआतील बिल्लावर येथे पोहोचल्या होत्या, जिथे त्यांनी माखन दीनच्या कुटुंबाला भेट दिली होती, ज्याने पोलिस कोठडीत कथित छळामुळे आत्महत्या केली होती. सोमवारी माध्यमांशी बोलताना इल्तिजा म्हणाल्या की, ओमर सरकारने त्यांच्या दोन पीएसओंना अर्ध्या तासात कोणताही दोष नसताना निलंबित केले. पण कठुआमध्ये माखन दीनवर अत्याचार करणाऱ्या एसएचओवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
तेव्हा ते दिल्लीत जेवत होते…
सोपोरमध्ये ट्रक चालकाची हत्या करणाऱ्या सैनिकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप इल्तिजा यांनी ओमर सरकारवर केला. ओमर अब्दुल्ला यांनी बिल्लावर येथील माखन दीनच्या कुटुंबाला भेटायला जायला हवे होते, पण त्यावेळी ते दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करत होते. गेल्या महिन्यातही, जेव्हा राजौरीमध्ये अन्नातून विषबाधा झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला, तेव्हाही ओमर दिल्लीत होते, असेही त्या म्हणाल्या.





