‘पुष्पा-2’ पाठोपाठ आता ‘या’ चित्रपटाच्या इव्हेंटनंतर अपघात, 2 चाहत्यांचा मृत्यू

GAME CHANGER EVENT: पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर एक मुलगा जखमी झाला होता. आता पुष्पा-2 पाठापोठ आणखी एका चित्रपटाच्या इव्हेंटनंतर अपघाताची घटना समोर आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या इव्हेंटनंतर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
राम चरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. त्यामुळे कलाकार आणि निर्मात्यांकडून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्री-रिलेज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये राम चरण आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण देखील उपस्थित होते.
या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या दोन चाहत्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अरवा मणिकंथा (वय 23 वर्ष) आणि ठोकडा चरण (वय 22 वर्ष) हे दोन्ही चाहते या इव्हेंटला आले होते. इव्हेंटनंतर घरी परताना त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही तरूणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आर्थिक मदतीची देखील घोषणा केली आहे. दोन्ही तरूणांच्या कुटुंबांना प्रत्येकी लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी अल्लू अर्जून गेला होता. यावेळी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अल्लू अर्जुनला अटक देखील करण्यात आली होती.





