जवळा ते पिंपरखेड रस्त्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर

जवळा – जामखेड तालुक्यातील जवळा – हळगाव – पिंपरखेड- अरणगाव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा, याकरिता आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. अखेर आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. महायुती सरकारने पिंपरखेड ते जवळा या भागातील रस्त्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
अरणगाव ते जवळा हा रस्ता काही वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आला होता. मात्र, काही वर्षांपासून हा रस्ता खराब झाला होता. हा रस्ता दुरूस्त व्हावा, अशी या भागातील जनतेकडून सतत मागणी होत होती. त्यानंतर आमदार प्रा. राम शिंदे यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. आ.शिंदे यांच्या पाठपुराव्यातून महायुती सरकारने अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात कर्जत – जामखेड मतदारसंघासाठी 93 कोटी 55 लाख रुपये खर्चाचे 25 रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. यामध्ये अरणगाव ते जवळा या रस्त्यामधील पिंपरखेड ते जवळा या भागातील रस्त्याच्या कामासाठी 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे. अरणगाव-पिंपरखे-हाळगा-जवळा रस्तांमध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे हे काम या निधीतून केले जाणार आहे.
जवळा ते पिंपरखेड या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, याकरिता आमदार प्रा. राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. आमदार शिंदे यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे. या भागातील जनतेच्या वतीने आमदार प्रा. राम शिंदे व महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो.
– प्रशांत शिंदे – भाजपा नेते





