दहा हजार कमाई अन् आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल 2 कोटींची नोटीस; सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर

Income Tax | बिहारमधील गया भागात राहणाऱ्या एका मजुराला आयकर विभागाने थेट 2 कोटी 3 हजार 308 रुपयांची नोटीस पाठवली आहे. गया येथील नवीन गोडाऊन परिसरात राहणारे राजीवकुमार वर्मा हे रोजंदारी कामगार असून ते शहरातील जुन्या गोदामात मजुरीचे काम करतात. अचानक आलेल्या या नोटिसीनंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे.
आयकर विभागाच्या नोटीसनंतर मजूर गेल्या ४ दिवसांपासून कामावर गेलेला नाही. नोटीसनंतर तो चिंतेत असून आयकर विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकारऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यावर त्यांनी पाटणा आयकर विभागाच्या कार्यालयात जाण्यास सांगितले, जिथून याबाबत स्पष्ट माहिती समजू शकते, असे सांगण्यात आले.
नेमकं काय आहे प्रकरण?
२२ जानेवारी २०१५ रोजी गया येथील कॉर्पोरेशन बँकेच्या शाखेत मी २ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले होते. पण मुदतपूर्तीपूर्वी काही कामासाठी १६ ऑगस्ट २०१६ रोजी हे पैसे काढून घेतले. त्यानंतर मजुरीचं काम सुरू केलं. महिन्याला १० ते १२ हजार रुपये मजुरी मिळत असलेला व्यक्ती काय कर भरणार असंही मजुराने म्हटले आहे.
तर नोटिसमध्ये २०१५-१६ या वर्षात २ कोटी रुपयांची फिक्स डिपॉझिट करण्यात आली होती, ज्याची रिटर्न फाइल अद्याप भरलेली नाही आणि आयकर विभागाचा करही जमा करण्यात आलेला नाही, असं सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गयामधील या घटनेनंतर या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे.





