पुणे जिल्हा | पहिल्या दिवशी २ कोटी १ लाख रूपये लोकसहभागातून जमा

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी २ कोटी १ लाख रूपये शिक्षक व पालकांकडून लोकसहभाग उपक्रमासाठी जमा झाले आहेत.
दि.१५ जून हा शाळेचा पहिला दिवस होता. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शिक्षकांना लोकसहभाग उपक्रमासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. पहिल्या दिवशी गरीब, होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य देणेसाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला.
जिल्ह्यात ३६२१ शाळांपैकी १६३० शाळेतील ५३२० शिक्षकांनी पुढे येऊन स्वतः ३० लाख ८० हजार ४५५ रुपये व पालक, दानशूर व्यक्ती यांच्याकडून १ कोटी ८० लाख ७०हजार ४५० रुपये इतका मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे.
या निधीतून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य घेतले. यामध्ये स्कूल बॅग, पाण्याची बाटली, वह्या, टेबल, खुर्च्या, चित्रकला वह्या, शालेय स्टेशनरी या प्रकारचे साहित्य विद्यार्थ्यांना घेण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व पालक,अधिकारी ,ग्रामस्थ यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी १ लाख रुपये संकलन करून साहित्य वाटप केले.
जिल्हा प्रशासनाकडून कौतुक
शिक्षकांनी केलेल्या या लोकसहभाग चळवळीचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा हा चांगला आहे. शाळा समाजाचा भाग झाला तर शाळांचा कायापालट होईल. यासाठी शिक्षक यांनी पुढाकार घ्यावा, असे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
सर्व पालक व शिक्षक यांनी एकत्रित काम केले तर शाळांचा भौतिक व शैक्षणिक हातभार लागेल. यासाठी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी पुढे येऊन शैक्षणिक गुणवत्तेला हातभार लावण्याचे नाईकडे यांनी आवाहन केले.





