पेशावर – हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांच्या खरेदीसाठी पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने 2.35 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांच्या वंशपरंपरागत घरांना राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय यापूर्वीच पाकिस्तान सरकारने घेतला आहे.
पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांताचे मुख्यमंत्री मेहमूद खान यांनी या घरांच्या खरेदीसाठी औपचारिक निधी मंजूर केला आहे. खैबर पख्तूनवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समितीने या दोन्ही वास्तूंची किंमत ठरवली होती.
पेशावरचे उपायुक्त मोहम्मद अली असतर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर चर्चा करून दिलीप कुमार यांच्या घरासाठी 80.50 लाख रुपये तर राज कपूर यांच्या घरासाठी 1.50 कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे. या घरांच्या भूमापनासाठी मारला हे एकक ग्राह्य धरले गेले आहे. मारला हे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सामायिकपणे वापरले जाणारे पारंपारिक एकक आहे. 272.25 चौरस फूट किंवा 25.2929 चौरस मीटर हे एका मारला चे एकक असते.
या दोन्ही घरांची खरेदी केल्यानंतर या वास्तू खैबर पख्तूनख्वा पुरातत्त्व विभागाच्यावतीने संग्रहालय म्हणून जतन केल्या जाणार आहेत. त्यासाठी पुरातत्त्व विभागाने खैबर पख्तूनख्वा सरकारकडे या दोन्ही ऐतिहासिक इमारती खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची औपचारिक मागणी केली आहे.
राज कपूर आणि दिलीप कुमार या दोघांचाही जन्म फाळणीपूर्वी पाकिस्तान मध्ये झाला होता आणि त्यांचे बालपणही तेथेच गेले होते.
राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर “कपूर हवेली’ या नावाने सुपरिचित असून किस्सा ख्वावानी बाजार या भागात ते आहे. राज कपूर यांचे आजोबा दिवाण बसवेश्वरनाथ कपूर यांनी 1918 ते 1922 दरम्यान या वास्तूची उभारणी केली होती. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म याच वास्तूमध्ये झाला होता.
या वास्तूला नंतर खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले. हिंदी चित्रपट सृष्टीतील आणखी एक दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचेही तब्बल 100 वर्षे जुने वडिलोपार्जित घर याच परिसरात आहे. सध्या या वास्तूची पडझड झालेली असून 2014 झाली तत्कालिन नवाज शरीफ सरकारने या वास्तूला राष्ट्रीय वारसा घोषित केले आहे.
या दोन्ही वास्तूंच्या मालकांनी यापूर्वी अनेक वेळा या इमारती जमीनदोस्त करून त्यांच्या जागेवर व्यवसायिक व्यापारी संकुल उभारण्याचे प्रयत्न केले होते. या दोन्ही वास्तू अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्याचा व्यापारी संकुलासाठी चांगला उपयोग होईल, असा जागा मालकांचा अंदाज होता. मात्र प्रत्येक वेळी पुरातत्व विभागाने दबाव आणून या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू जतन करण्यास सरकारला भाग पडले, आता या वस्तू खरेदी केल्या जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे लवकरच राज कपूर आणि दिलीपकुमार यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तानमध्ये संग्रहालय म्हणून जतन केले जाईल,