पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल; प्रवासांच्या सोईसाठी खास ॲपही केले तयार

Mumbai Metro 3 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी झाले. कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेचा पहिल्या टप्प्यातील १२.६९ किमी लांबी हा मार्ग आहे. आजपासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला आहे. सकाळी 11 वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटली आहे.
मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यामुळे रस्त्यावरील कोंडीतून या प्रवाशांची सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांच्या वेळीचीही बचत होणार आहे. आरे – बीकेसी अंतर आता भुयारी मेट्रोमुळे केवळ २२ मिनिटांत पार करता येणार आहे.
या मेट्रोमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ आणि टर्मिनल २ यांनाही जोडणी मिळणार आहे. मेट्रो १ मार्गिकेच्या मरोळ नाका स्थानकालाही मेट्रो ३ मार्गिकेची जोडणी मिळाली आहे. त्यातून मुंबईबाहेरून पश्चिम उपनगरीय रेल्वेने येणारा प्रवासी अंधेरीत उतरून मेट्रो १ ने मरोळ नाका स्थानक गाठून पुढे विमानतळ, बीकेसी अथवा सीप्झकडे जाऊ शकणार आहे.
तर, मध्य रेल्वे मार्गावरून येणारे प्रवासी घाटकोपर येथून मेट्रो १ ने प्रवास करून मरोळ नाका येथे येऊ शकतात. तसेच तिथून पुढील प्रवास मेट्रो ३ मार्गिकेवरून करू शकणार आहेत.
मेट्रो कनेक्ट 3 ॲप
मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट 3 ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपद्वारे प्रवाशांना आरे ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांची, स्थानकातील सोयीसुविधांची आणि इतर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच क्यू आर कोड स्कॅनिंग तिकीट, ई तिकीट सेवेसह ईव्हीएम मशीनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
त्याचबरोबर प्रवाशांच्या तक्रारी ॲपच्या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहेत. या तक्रारींचे निवारणही ॲपद्वारे केले जाणार आहे. मेट्रो स्थानाकावर उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी बस, टॅक्सी, रिक्षाचा पर्याय याचीही माहिती या ॲपद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.
मुंबई महानगरात जवळपास ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, येत्या काही वर्षांत हे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकणार आहे.
हेही वाचा:





