satara | राज्य शासनाकडून जिल्ह्याला 191 कोटीचा निधी

सातारा, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, ग्राम विकास, ऊर्जा, रस्ते बांधणी अशा विविध कामांसाठी जिल्हा विकास आराखड्याच्या निधीपैकी 33 टक्के याप्रमाणे 191 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
या कामकाजाचे नियमन आणि ती कामे नियमित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची 16 जुलै रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक नियोजन भवनात होणार आहे
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावली जातात. जानेवारी महिन्यात वर्षभरातील विकास कामांचा आराखडा तयार केला जातो. 2024- 25 या आर्थिक वर्षासाठी 671.63 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, ऊर्जा, रस्ते, डोंगरी विकास प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी यासारख्या विविध घटकांचा समावेश करून कामे प्रस्थापित करण्यात आली आहेत.
ही कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यंत्रणांना निधी उपलब्ध केला जातो. राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्यातील विकास कामांसाठी 191 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झाला आहे. वित्त विभागाने नुकताच याला हिरवा कंदील दिला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यंत्रणांना किती निधी द्यायचा याचा आढावा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. ही बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पुढील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लक्षात घेता या बैठकीत विविध कामांना मिळणारी मंजुरी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहतात.
गेल्या काही वर्षापासून नियोजन समितीला जास्तीत जास्त निधी देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहिला आहे. जिल्ह्याचा एकूण आराखडा 671 कोटी रुपयांचा असून त्याबाबतचे विकास कामांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडून मागविण्यात आले आहेत.





