हिमाचल प्रदेशला केंद्राची 189 कोटींची मदत

शिमला : हिमाचल प्रदेशला भेडसावत असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्याला मोठा दिलासा दिला आहे. गृह मंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्रीय वाटा म्हणून हिमाचल प्रदेशसाठी आगाऊ सहाय्य म्हणून १८९.२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. देशातील १४ पूरग्रस्त राज्यांना ५,८५८.६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. २०२३ मध्ये हिमाचलमधील मान्सून आपत्तीमध्ये सुमारे १२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
या संदर्भात केंद्राच्या पथकाने तीन वेळा येऊन सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांचे मूल्यांकन केले. त्यानंतर हा अहवाल गृह मंत्रालयाला देण्यात आला. याआधीही केंद्र सरकारने आपत्ती निवारण म्हणून हिमाचलला निधी दिला आहे. पूरग्रस्त आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूर या राज्यांमध्ये आंतर-मंत्रालयी पथके पाठवण्यात आली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यातील लोकांचे दुःख कमी करण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे.
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हिमाचल व्यतिरिक्त बिहारला ६५६ कोटी रुपये, बंगालला ४६८ कोटी रुपये आणि महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, केरळ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा या राज्यांनाही मदत देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आंतर-मंत्रालयीन पथकाने आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूरमध्ये झालेल्या नुकसानीचे आधीच मूल्यांकन केले आहे. लवकरच इतर राज्यांचा दौरा करणार आहे. केंद्रीय आपत्ती सहाय्य म्हणून २१ राज्यांना १४,९५८ कोटी रुपयांहून अधिक निधी जारी करण्यात आला आहे.





