पुणे जिल्हा | लाडकी बहीणमधून इंदापूरला 185 कोटी

इंदापूर, (प्रतिनिधी) – राज्य शासनाने बजेटमध्ये राज्यातील भगिनींसाठी अनोखी तरतूद केलेले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील लाभार्थी असलेल्या एकही महिला, या योजनेपासून वंचित राहता कामा नये. याची खबरदारी प्रशासनाने व संबंधित यंत्रणेने तंतोतंत पाळावे. असे आवाहन राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील निमसाखर निरवांगी शेळगाव खोरोची भांडगाव लुमेवाडी पिंपरी बुद्रुक या गावात लाडकी बहीण योजना शिबिर ग्रामपंचायतीच्या वतीने, आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे महिला भगिनींना मार्गदर्शन करीत होते.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे माहिती देताना आमदार भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या वाट्याला वार्षिक 185 कोटी इतकी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच दिवसाला 55 लाख रुपये इंदापूर तालुक्यात शासनाचे येणार आहेत.
गावागावात प्रत्येक घराघरात जाऊन या योजनेचे फॉर्म दाखल करा. ऑनलाइन करा, हे समाज उपयोगी काम असल्यामुळे यातून पुण्याचे काम घडणार आहे. जर इंदापूर तालुक्यातून या योजनेचे काम चांगले झाले तर, तालुक्यातील महिला भगिनींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहणार आहेत. अशीही अपेक्षा आमदार भरणे यांनी व्यक्त केली.
मुलींना उच्चशिक्षित करा
गोरगरीब कुटुंबाचा प्रपंच आनंदात चालावा यासाठी शासन वेगवेगळ्या योजना देत आहे. राज्यातील सर्वच मुलींना मोफत शिक्षण सरकारने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे एकही मुलगी आर्थिक कारणामुळे घरी ठेवू नका. मुलांनी आई-वडिलांचे महत्त्व कधी विसरू नये, आपल्या सुखात आणि दुःखात आई वडीलच असतात. याची जाण ठेवावी. असेही आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.





