Pimpri : महापालिकेच्या शाळांमध्ये १८४ शिक्षक पदे रिक्त

पिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. प्राथमिक शाळांमधील तब्बल १८४ शिक्षक पदे रिक्त आहेत. काळभोरनगर येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर शाळेत १५० विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम करणारी आहे.
यासंदर्भात युवा नेते विशाल बाळासाहेब काळभोर यांनी शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांनी सर्व शाळांमध्ये तातडीने शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची मागणी केली.
महापालिका १०५ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा चालवत आहे. या शाळांमधून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची पहिली घटक चाचणी परीक्षा ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर मोरे यांनी ऑगस्टअखेर रिक्त पदे भरली जातील, असे आश्वासन दिले आहे.





