भारताच्या 18 मच्छिमारांना श्रीलंकेकडून अटक

कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी केल्याच्या आरोपाखाली भारताच्या 18 मछ्छिमारांना श्रीलंकेच्या तटरक्षक दलाने अटक केली आहे. या मच्छिमारांच्या 3 मच्छिमार नौका देखील जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान श्रीलंकेच्या उत्तरेकडील डेल्फ्ट बेटाजवळून या मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे, असे एका संकेतस्थळाने म्हटले आहे.
अटक केलेल्या मच्छिमारांना पुढील कायदेखील कारवाईसाठी कांकेसंतुराई येथील मच्छिमारांच्या बंदरामध्ये नेण्यात आले आहे, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन गयान विक्रमसूर्य यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात देखील भारताच्या 4 मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौलाने अटक केली होती आणि त्यांचे ट्रॉलर जप्त केले होते. या अलिकडच्या घटनांपूर्वी 180 हून अधिक भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली होती आणि 2024 मध्ये श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केल्याबद्दल त्यांचे 25 ट्रॉलर जप्त करण्यात आले होते, असे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
2023 या वर्षात भारताच्या 240 ते 245 मच्छिमारांना श्रीलंकेने अटक केली होती. त्यापेक्षा या वर्षातील संख्या 75 टक्क्यांनी जास्त आहे. बहुतेकवेळा श्रीलंका आणि तामिळनाडू दरम्यानच्या चिंचोळ्या पाल्कच्या समुद्रधुमीमध्ये मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छिमारांवर श्रीलंकेकडून कारवाई केली जाते. हा भाग मासेमारीसाठी दोन्ही देशांसाठी समृद्ध आहे.





