गांधीनगर : 9 मे रोजी सलग दुस-या दिवशी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. कच्छ सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करताना तीन ड्रोन पाडण्यात आले. गुजरातच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने राज्यातील 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आले असून भूज विमानतळ लष्कराने ताब्यात घेतले आहे. दरम्यान 18 जिल्ह्यांत अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, भरूच, भावनगर, डांग, जामनगर, जुनागढ, खेडा, कच्छ, मेहसाणा, पंचमहाल, राजकोट, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर आणि वडोदरा ही आहेत. बनासकांठा, कच्छ आणि पाटणच्या सीमावर्ती भागातील गावांमध्ये गुरुवारी रात्री ब्लॅकआउट करण्यात आले. मात्र, सकाळी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर येथील आपत्कालीन ऑपरेशन सेंटरमध्ये एक बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांचे वरिष्ठ सचिव आणि संबंधित जिल्ह्यांचे प्रशासकीय प्रमुख, पोलिस अधिकारी इत्यादींसोबत आढावा बैठक घेतली. सुरक्षेचा विचार करून, गुजरातच्या सीमावर्ती गावांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यासह, भूज विमानतळ लष्कराकडे सोपवण्यात आले आहे. तसेच राज्यातील ज्योतिर्लिंग सोमनाथ, शक्तीपीठ अंबाजी आणि द्वारका मंदिर यासारख्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सोमनाथ मंदिराला आधीच झेड प्लस सुरक्षा आहे. याअंतर्गत येथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. यासोबतच येथे बॉम्ब आणि श्वान पथके देखील तैनात आहेत. याशिवाय हजिराच्या किनारी भागातही सुरक्षा वाढवण्यात आलीआहे. येथेही नौदल कर्मचारी जहाजे आणि हेलिकॉप्टरसह तैनात आहेत. याशिवाय, समुद्राच्या १२ मैलांच्या परिघात तटरक्षक दल तैनात करण्यात आले आहे.