पिरंगुट – मावळ तालुक्यातील मावळ अथलेट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे ते दिवेआगर या सायकल फेरीने तळेगावपासूनचे 178 किलोमीटरचे अंतर चौदा तासांत पूर्ण केले. या सायकल फेरीद्वारे पर्यावरण वाचवा – देश वाचवा, सायकल चालवा – आरोग्य सांभाळा, मुलगा – मुलगी एक समान आदी सामाजिक संदेश देण्यात आला. यामध्ये सुभाष वाजे, संपत चौधरी, प्रमोद निंबाळकर, साई नाईक, संतोष झेंडे, योगेश चौधरी, प्रज्ञा अजगर, सचिन धामणकर, रमेश पौल, रवींद्र कुंभार आणि प्रवीण अडसुरे आदी सहभागी झाले होते. आतापर्यंत सायकलवर तळेगाव ते गोवा, पंढरपूर, नाशिक, दमण, कोल्हापूर, गेट वे ऑफ इंडिया अशा राईड केल्या आहेत. पिरंगुट येथे उपसरपंच प्रवीण कुंभार यांनी या सायकल फेरीचे स्वागत केले.