महानगरपालिकेने 71 हॉस्टेलमध्ये कक्ष करण्याची ठेवली तयारी
13 वसतिगृहे तयार ठेवणार
पुणे – शहरात करोनाच्या रुग्णांची संख्या देशभरातील इतर शहरांच्या तुलनेत कमी असली तरी भविष्यात या साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे शहरातील 71 हॉस्टेलमध्ये महापालिकेने विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी तयारी ठेवली आहेत, त्यांची क्षमता तब्बल17 हजार खाटांची आहे. दरम्यान, तूर्तास 10 खासगी महाविद्यालयांची 13 वसतिगृहे टप्प्याटप्प्याने तयार ठेवण्यात येणार असून त्याची खाटांची क्षमता 2 हजार असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी स्पष्ट केले.
शहरात 9 मार्चपासून करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर रुग्णांचा आकडा वाढतच असून शहरातील रुग्णांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. मात्र, शहरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे या आजाराला अटकाव घालण्यासाठी मदत होत असली तरी, रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात जास्तीत जास्त विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात येत आहेत. पालिकेने आतापर्यंत सुमारे 400 रुग्णांची क्षमता असलेली 4 विलगीकरण कक्ष तयार आहेत. त्यामुळे आता पालिकेने पुढच्या टप्प्यात शहरातील 71 हॉस्टेल पाहणी केली असून त्यात विलागीकरण कक्ष सुरू करण्याची तयारी केली जाणार असल्याचे मुठे यांनी स्पष्ट केले.
50 हॉस्टेलच उपयुक्त…
प्रशासनाने 71 हॉस्टेल निश्चित केली असली तरी त्यातील केवळ 48 ते 50 हॉस्टेलच विलगीकरण कक्ष करण्यासाठी वापरता येणारी आहेत. करोना हा साथरोग असल्याने अशा रुग्णांना स्वच्छतागृह हे स्वतंत्र लागते. मात्र, पालिकेने पाहणी केलेल्या 20 ते 22 हॉस्टेल मध्ये 3 ते 4 रूमसाठी एक स्वच्छतागृह आहे. त्यामुळे अशी हॉस्टेल वापरता येणार नसल्याचे मुठे यांनी सांगितले.