नवी दिल्ली – भारतातील एकूण लोकसंख्येच्या 71 टक्के गटाला अद्यापही योग्य आहार मिळत नाही. चुकीचा आहार घेतल्यामुळे होणाऱ्या अनेक आजारांमुळे दरवर्षी 17 लाखपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवोर्मेन्ट या संस्थेने स्टेट ऑफ इंडीयाज एन्व्हायरमेंट या नावाचा एक अहवाल तयार केला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. चुकीचा आहार घेतला जात असल्यामुळे अनेक भारतीय मधुमेह, हृदयविकार, श्वसनाचे रोग, कर्करोग या विकारांमुळे मरण पावत असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. आहारात फळे, भाज्या आणि अन्नधान्याचे प्रमाण कमी झाले असून प्रक्रिया केलेले मटण, रेड मिट, आणि साखरयुक्त पेये त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. समतोल आणि योग्य आहार मिळत नसल्याने भारतीय नागरिकांमध्ये अतिशय कमी वजन असण्याचे किंवा अतिशय जास्त वजन असण्याचे दोन्ही विकार आढळून आले आहेत. योग्य आहाराच्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सुद्धा अनेकांना योग्य आहार घेणे शक्य होत नाही असे या अहवालात म्हटले असून शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये योग्य आहाराच्या वस्तू अधिक महाग आहेत असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. भारतीय लोकांच्या आहारामध्ये दैनंदिन ज्या वस्तू येतात त्या सेवन करताना योग्य प्रमाण राखले जात नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे असेही म्हणण्यात आले आहे. आहारात असणाऱ्या वस्तूंचा योग्य समतोल राखला जात नसल्याने अनारोग्याची ही समस्या उद्भवली आहे. यावर मात करायची असेल तर दैनंदिन जो आहार घेतला जातो त्याचे योग्य प्रमाण तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवणे आवश्यक आहे असा सल्लाही या अहवालात देण्यात आला आहे.