ठरलेल्या ठिकाणी ‘ती’वाट पाहत होती. ‘तो’ व्यवस्थित तयार होऊन वेळेत पोहोचला. मनात हुरहूर घेऊन दोघांची ‘त्या’ कॅफेमध्ये पहिली भेट झाली. लाजत-लाजत सुरू झालेल्या गप्पा हळूहळू रंगू लागल्या. जोडीला कोल्ड्रिंक पिणं सुरू होतं. कोल्ड्रिंकव्यतिरिक्त त्या दोघांनी आणखी काहीच मागवलं नाही. दोघात मैत्री होईल का? नातं मैत्रीच्याही पलीकडे जाईल का? अशा विचारांनी ‘त्याचे’ पाय जमिनीपासून काहीसे वरच राहिले. ते जमिनीवर आले, ते कोल्ड्रिंकचं बिल पाहून! तब्बल 16 हजार 400 रुपयांचं कोल्ड्रिंक भारतात मिळतं, यावर त्या बिचार्याचा विश्वासच बसला नाही. ‘त्याने’ अर्थातच एवढं अवास्तव बिल लावण्यामागचं कारण विचारलं. बिल द्यायला नकार दिला. त्यावेळी कॅफेमधील इतर लोक त्याच्याभोवती जमले. बिल भरल्याशिवाय तुला बाहेर पडता येणार नाही, असं सांगितलं. बाचाबाची झाल्यावर सर्वांनी त्याला 50 हजार रुपये मागितले. पण बोलता-बोलता ‘त्याने’ एक शहाणपणा केला. आपलं लाइव्ह लोकेशन मित्राला पाठवलं. घडलेल्या घटनेची माहिती मित्राला दिली. मित्राने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आणि एक मोठ्ठं रॅकेट सापडलं. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये घडलेल्या या घटनेतली ‘ती’ कोण? असा प्रश्न अनेकांना पडला. मग लक्षात आलं, तीही लुटारूंच्या टोळीत सामील होती. मग प्रश्न आला ‘ती’ आणि ‘तो’ यांची ओळख कुठे झाली? उत्तर होतं, डेटिंग अॅपवर! सगळाच मोठ्ठा चक्रव्यूह होता. संबंधित कॅफे हा त्याचा केंद्रबिंदू. माणूस तिथपर्यंत यायचा; पण परतीच्या वाटा बंद! असे अनेक ‘तो’ तिथं येऊन गेलेले. अव्वाच्या सव्वा बिलं भरून..! बिलावरून वाद घातला तर थेट खंडणीची मागणी! रक्कम दिली नाही, तर माणसाची सुटकाच होत नसे. पैसे मिळेपर्यंत तिथेच अडकवून ठेवलं जात असे. मनाजोगा जोडीदार मिळवण्याच्या नादात खिसा रिकामा. प्रसंगी उसनवारी करण्याची, कर्ज काढण्याची नामुष्की. हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. अनेकांचा खिसा विविध मार्गांनी रिकामा झालाय. पण माध्यम एकच. डेटिंग अॅप. फसवणूक झाल्यास सांगायचीही चोरी. बभ्रा होण्याची भीती. ही काही लग्नं जुळवणारी अधिकृत संकेतस्थळं नव्हेत. इथं ‘प्रेम’ मिळवून देण्याचा वायदा केला जातो. फोनच्या स्क्रीनवर एकामागून एक फोटो येतात. पसंत पडल्यास ‘स्वाइप लेफ्ट’ आणि पुढची प्रोफाइल बघण्यासाठी ‘स्वाइप राइट’! पण किती जणांना प्रेम मिळालं आणि किती जणांना मनस्ताप, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. अशा काही डेटिंग अॅप्सनी यूजर्सचा डेटा विकल्याचेही आरोप झालेत. ‘पटकन जोडीदार मिळवा आणि अॅप डिलीट करा’ ही केवळ जाहिरात! प्रत्यक्षात मनाजोगा जोडीदार मिळण्यासाठी जितका अॅपचा वापर जास्त, तितका संबंधितांचा नफा जास्त. कुणी लाइक केलं तर जिवाला बरं वाटतं. प्रोफाइल बघण्याचा छंद लागतो. चॅटिंग सुरू होतं. ‘प्रीमिअम मेंबरशिप’ घेण्याचा मोह अनावर होतो. हळूहळू या संपूर्ण प्रक्रियेचं व्यसन जडतं. मग अॅप तर डिलीट होत नाहीच; उलट डोक्यातले महत्त्वाचे विषय डिलीट होतात. अॅप अधिकृत आणि खात्रीशीर असलं तरी व्यसन हमखास! जोडीदार मिळवणारे भाग्यवंत असतीलही; पण मानसशास्त्राचा पक्का अभ्यास असणारे डेटिंग अॅपवालेच अधिक भाग्यवंत!