पिंपरी – शहरात गेल्या 24 तासांत आणखी 161 जणांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 95231 इतकी झाली आहे. महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 19) दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 161 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात करोनामुळे 1 रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत 77 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे करोनावर मात केल्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 91784 इतकी झाली आहे. दिवसभरात 2407 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1913 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 754 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 959इतकी आहे. शहराबाहेरील 102 करोनाबाधित सध्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. तर शहरातील 116 रुग्ण शहराबाहेर उपचार घेत आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये शहरातील 5 लाख 26 हजार 482 जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 4 लाख 29 हजार 338 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात करोनाने एकाचा मृत्यू सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात करोनाने एकाचा मृत्यू झाला. तर, नव्याने 12 करोनाबाधित रुग्णांची भर पडली. करोनाने मृत्यू झालेला 45 वर्षीय पुरुष रुग्ण हा वाल्हे (ता. पुरंदर) येथील रहिवाशी आहे. 12 तारखेला त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 15 तारखेला त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी (दि. 18) मृत्यू झाला. करोनाबाधित रुग्णांमध्ये टेंभुर्णी (सोलापुर), औंध, काळेवाडी, मोरवाडी-पिंपरी, पिंपळवाडी-आळेफाटा, बाणेर, रहाटणी, सासवड येथील रुग्णांचा समावेश आहे. सुस-पाषाण रस्ता, कोथरूड, निरा (ता. पुरंदर) येथील रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांना आज घरी सोडले. त्यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 646 जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.